उस्मानाबाद -मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चाेरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. उस्मानाबाद शहरातील बॅंक काॅलनी तसेच उमरग्यातील न्यू बालाजी नगर भागतील प्रत्येकी एक अशी दाेन घरे फाेडून अज्ञाताने साेन्या-चांदीचे दागिने तसेच राेकड लंपास केली. या प्रकरणी संबंधित पाेलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नाेंद झाला आहे.
उस्मानाबाद शहरातील बॅंक काॅलनी भागातील कमलाकर रामराव पवार यांच्या राहत्या घराचे कुलूप ताेडून अज्ञाताने आत प्रवेश केला. यानंतर घरातील चांदीचे दागिने, वस्तू तसेच राेख १३ हजार रूपये लंपास केले. या प्रकरणी पवार यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दुसरी घटना उमरगा शहरातील न्यू बालाजी नगर भागात घडली. दस्तगीर रूस्तमअली चाबुकस्वार १७ ते १८ फेब्रुवारी या काळात बाहेरगावी गेले हाेते. त्यामुळे त्यांचे घर बंद हाेते. हीच संधी साधत अज्ञाताने दरवाजावरील कुलूप ताेडून आत प्रवेश मिळविला. यानंतर कपाटातील चांदीचे दागिने व राेख २ हजार असा एकूण ३२ हजारांचा ऐवज चाेरून नेला. साेबतच शेजारी अविनाश अंबुरे, प्रमाेद गुमटे यांच्या घरीही चाेरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी चाबुकस्वार यांनी उमरगा ठाण्यात फिर्याद दाखल केली असता, शुक्रवारी अज्ञाताविरूद्ध चाेरीचा गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.