तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढले. त्यासोबत हरभऱ्याचीदेखील ११ हजार २६१ हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली होती. यंदा हरभरा पिकास शासनाने ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी येथील शिवाजी खरेदी केंद्रात १६ शेतकऱ्यांनीच ऑनलाइन नोंदणी केली आहे. बाजारपेठेत जवळपास ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० पर्यंत भाव मिळत असला तरी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांकडे हरभरा नेल्याचे दिसून येते. दरम्यान, ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना आता खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
चौकट
जनजागृतीची गरज
शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५ हजार १०० रुपये प्रती क्विंटल असला तरी बाजारपेठेत व्यापारी यांनी ४ हजार ५०० ते ४ हजार ६०० रुपये क्विंटल दर दिल्याने शेतकऱ्यांनी संघाकडे ऑनलाइन नोंदणी करून पुन्हा खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता बाजारपेठेत व्यापाऱ्यांना हरभरा देणे पसंद केल्याचे दिसते. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.