उस्मानाबाद - येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकाऱ्यास अज्ञाताने सुमारे दीड लाख रुपयांनी ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी आनंदनगर पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच आणखी एक घटना समाेर आली आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळाचे लेखाधिकारी फरहतउल्ला हुसेन यांच्या बँक खात्यातून थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १ लाख ५० हजार रुपये कपात झाल्याचा लघुसंदेश त्यांना १३ सप्टेंबर राेजी आला. समाेरील व्यक्तीला त्यांनी आपल्या खात्यासंबंधी काेणतीही माहिती दिली नसताना, ही रक्कम परस्पर वळती केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी १४ सप्टेंबर राेजी आनंदनगर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.