लोहारा : लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे एका ४२ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहारा पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सालेगावसह परिसर हादरून गेला आहे.
सालेगाव येथील गोविंद व्यंकट करदोरे (वय ४२) यांना तीन एकर शेती आहे. शेतात कांद्याची लागवड केली आहे. शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा असल्यामुळे गोविंद हे आपल्या आईसोबत कांद्याला पाणी देण्यासाठी शुक्रवारी रात्री शेतात गेले होते. कांद्याला पाणी देत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी गोविंद यांच्या डोक्यात घातक हत्याराने वार करून जखमी केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोविंद यांचा मृतदेह विहिरीलगत त्यांच्या आई रुक्मिणी यांना दिसला. त्यांनी आडरोड केली असता ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, लोहारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. यानंतर उस्मानाबाद येथून श्वान पथकही पाचारण करण्यात आले. घटनास्थळापासून पंधरा ते वीस किमीचा परिसर पाेलिसांनी पिंजून काढला. मात्र पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी मयत गोविंद यांच्या आई रुक्मिणी करदोरे यांनी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पाेनि धरमसिंग चव्हाण करीत आहेत.