उस्मानाबाद : उस्मानाबाद पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे वेतन डिसेंबर २०२० पासून ठप्प आहे. त्यामुळे हे शिक्षक संतप्त झाले असून, शुक्रवारी त्यांनी बैठक घेत न्यायालयात जाण्याचा निर्धार केला आहे.
उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत असलेल्या २६ शाळेमध्ये ८२ शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. मार्च २०२० पासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे नगर परिषदेच्या सर्व शिक्षकांनी घरोघरी जाऊन दोन वेळा सर्वेक्षण केले. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा सर्व्हे ॲपद्वारे पूर्ण केला. तर चेक पोस्टवर दिवस व रात्र पाळीमध्येदेखील काम केले आहे. पोलिसांबरोबर दंड वसुलीसाठी चौकाचौकात थांबून काम केले. असे असतानाही त्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. नेहमीच तीन-तीन महिने पगार होत नसल्याच्या तक्रारी या शिक्षकांनी केल्या आहेत. शिवाय, मार्च २०२० चे २५ टक्के वेतन व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता नगर परिषदेला उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेला असतानादेखील तो अद्याप दिला गेला नाही. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत आहे. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे जीवन विमा, बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर न गेल्यामुळे त्याचा आर्थिक भार शिक्षकांना सोसावा लागत आहे. यामुळे शिक्षक आक्रमक झाले असून, महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत याविषयी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष श्यामराव कोळी, राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत घाटेराव, कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, मार्गदर्शक जयंत इंदापूरकर, शंकर घंटे, गुणवंत टारफे, संगीता शिंदे, सुवर्णा धोत्रे, स्नेहलता कुलकर्णी, आतेसा फातेमा, नसीम बेगम, एस.आय. पिरजादे, एस.एच. बुलबुले, ए.झेड. अन्सारी, पी.आर. जांभळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.