कसबे तडवळे -उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळेसह परिसरातील शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे वाढला आहे. त्यामुळे रबी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. परिणामी ज्वारीच्या कडब्याचा दर वाढला आहे. सध्या शंभर पेंढ्यांसाठी शेतकऱ्यांना दीड हजार रुपये माेजावे लागत आहेत.
मागील पाच-सात वर्षांपासून कसबे तडवळेसह परिसरातील शेतकरी नगदी पिकांवर भर देत आहेत. उसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी वाढले आहे. याचा थेट परिणाम रबी हंगामातील ज्वारीच्या पेऱ्यावर झाला आहे. ज्वारीचे क्षेत्र वर्षागणिक घटू लागल्याने पशुपालक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रबी हंगामातील ज्वारीची काढणी बहुतांश शेतकऱ्यांनी उरकली आहे. ज्यांच्याकडे पशुधन नाही, असे शेतकरी शेतातच कडबा विक्री करीत आहेत. पशुपालक शेतकरीही शेतातून कडबा विकत नेत आहेत. सध्या शेतकऱ्यांना कडब्याच्या शंभर पेंढ्यांसाठी दीड हजार रुपये माेजावे लागत आहेत. म्हणजेच एक पेंढी पंधरा रुपयांना पडत आहे. भविष्यात कडब्याचे आणखी दर वाढतील, असे काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
पाॅईंटर...
मागील काही महिन्यांपासून इंधनाचे दर झपाट्याने वाढू लागले आहेत. गतवर्षी एक एकर नांगरटीसाठी हजार ते बाराशे रुपये लागत हाेते. आता हा दर दाेन हजारांवर गेला आहे. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने शेती करणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक शेतकरी आता बैलांच्या सहाय्याने शेती करण्याकडे वळले आहे. माेडलेला बैल बारदाना पुन्हा उभा केला आहे. याचाही परिणाम कडब्याच्या दरावर झाला आहे.