ईट -राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नाडतात. पीक कर्ज वाटपाचा आलेख पाहिल्यानंतर यात तथ्यही दिसून येते. परंतु, भूम तालुक्यातील ईट येथील महाराष्ट्र बँकेची शाखा त्यास अपवाद ठरताना दिसते. शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जावून कर्ज देण्याचा उपक्रम राबविल्यानंतर आता जे शेतकरी वर्षानुवर्षे थकबाकीत गेले आहेत. त्यामुळे त्यांना नवीन कर्जही घेता येत नाही. अशा शेतकऱ्यांना या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठी एकरकमी कर्जफेड याेजना सुरू केली आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत शेकडाे शेतकरी कर्जमुक्त झाले. दीड ते पावणेदाेन काेटी रुपये शेतकऱ्यांनी पुढे येत भरले. अशा शेतकऱ्यांना अवघ्या ४८ तासांत नवीन कर्ज बँकेकडून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. यामुळे पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांसाठी कठीण हाेते. त्यामुळे पीक कर्जाची रक्कम वर्षागणिक वाढत जाते. परिणामी संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा एकही बँक पीक कर्ज देत नाही. अशा स्वरूपाच्या आर्थिक विवंचनेतून शेतकरी मृत्यूचा फास जवळ करतात. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ‘एकरकमी कर्जफेड’ याेजना हाती घेण्यात आली आहे. या याेजनेत ईटसह परिसरातील अधिकाधिक शेतकरी सहभागी व्हावेत, यासाठी शाखा व्यवस्थापक उत्कर्ष कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनजागृती केली. त्याचाच परिणाम म्हणून की काय, २३ फेब्रुवारीपासून शेकडाे शेतकऱ्यांनी पुढे येत तब्बल दीड ते पावणेदाेन काेटींचा भरणा केला. थकबाकी भरल्यानंतर आपणाला नवीन कर्ज मिळणार नाही, अशी चर्चा हाेती. परंतु, शाखाधिकारी कांबळे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचा विश्वास दिला हाेता. त्यानुसार अवघ्या ४८ तासांत १३ शेतकऱ्यांना नव्याने अर्थसहाय्य केले आहे. याची सुरुवात क्षेत्रीय प्रबंधक सुनिता भाेसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विभागीय कृषी अधिकारी श्रीशेन माहेरकर, राहुल सुरवसे आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
क्षेत्रीय प्रबंधक सुनिता भाेसले यांच्या मार्गदर्शनाखाली याेजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा माेठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दहा-बारा दिवसांत दीड ते पावणेदाेन काेटींची वसुली झाली आहे. या शेतकऱ्यांना लागलीच नवीन पीक कर्ज देण्यात येत आहे. अन्य शेतकऱ्यांनीही पुढे यावे.
-उत्कर्ष कांबळे, शाखाधिकारी, ईट.