लोहारा : चालू हंगामात पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफ व एनडीआरएफअंतर्गत मदत करावी, अशी मागणी रायुकाँचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही जिल्ह्यातील अगदी नगण्य शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. परिणामी, चालू हंगामात तीस टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरविली. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ९९० अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. तसेच त्यापोटी शेतकरी व शासनाने पीक विमा हप्ता म्हणून ६३९ कोटी रुपये जमा केले होते. मात्र, यावर्षी केवळ ६ लाख ६७ हजार २८७ अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असून, त्यापोटी शेतकरी व शासनाकडून ५८१ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहेत. यांचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा दोन लाख ८१ हजार ७०३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही.
दरम्यान, यावर्षी पावसाने सतत २३ दिवसांचा खंड दिल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी ३० ऑगस्ट रोजी काढलेली आहे; परंतु त्याचा फायदा केवळ पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकरी नुकसान होऊनही मदतीपासून वंचित राहणार आहेत. एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत पूर दुष्काळ अतिवृष्टी चक्रीवादळे यापासून होणाऱ्या नुकसानीसाठी मदत करता येते. यावर्षी पावसाच्या खंडामुळे उत्पादनात घट झाली आहे, तसे महसूल व कृषीचे पंचनामेदेखील आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत देण्यास काहीही अडचण येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.