उस्मानाबाद - जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांवरील शिक्षकांच्या मदतीने आता गावागावांतील काेराेना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेण्यात येणार आहे. एवढेच नाही तर डाेअर-टू-डाेअर जाऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, लाेक मास्क वापरताहेत की नाही, यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीईओ डाॅ. विजयकुमार फड यांनी शिक्षकांवर साेपविली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात प्रतिदिन दाेनशे ते सव्वादाेनशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाययाेजना हाती घेतल्या आहेत. नियम माेडणा-यांवर कठाेर कारवाई करण्याचे आदेश आहेत. यासाेबतच एखाद्या गावातील वाॅर्डात वा प्रभागात काेराेनाग्रस्त आढळून आल्यास संबंधिताच्या संपर्कात नेमके काेण-काेण आले हाेते, हे शाेधणे अत्यंत गरजेचे असते. हे काम सध्या आराेग्य यंत्रणेच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु, दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, ही यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळेच की काय, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांतील शिक्षकांची या कामात मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ड्राफ्टही तयार करण्यात आला आहे. हे काम चाेख पार पाडले जावे, यासाठी जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर स्वतंत्र कमिट्या असणार आहेत. गावपातळीवरील कामांवर त्यांचे नियंत्रण असेल. या कामाचे थेट सीईओंना रिपाेर्टिंग केले जणार आहे.
शिक्षकांना काय करावे लागणार?
एखाद्या वाॅर्डात काेराेनाग्रस्त आढळून आल्यास संपर्कातील व्यक्तींचा शाेध घ्यावा लागेल.
गावातील विविध दुकानदार, भाजी, दूध विक्रेत्यांची वेळाेवेळी भेट घेऊन काेराेना राेखण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांची माहिती द्यावी लागणार.
निर्धारित वाॅर्डातील घराेघरी भेट देऊन कुटुंबांतील सर्व सदस्यांची नाेंद ठेवून थाेडीबहुत लक्षणे असली तरी टेस्ट करून घेण्यासाठी विनंती करावी लागणार.
गावातील प्रत्येक व्यक्ती मास्कचा वापर करते की नाही, यावर लक्ष ठेवावे लागणार.
विवाह अथवा इतर कार्यक्रमांची परवानगी घेतल्यानंतर नियमांचे पालन हाेते की नाही, हेही पाहावे लागणार. नियमांचा भंग हाेत असल्यास तालुका, जिल्हा प्रशासनाला कळवावे लागणार.
साेलापूरच्या धर्तीवर उपक्रम...
उस्मानाबादला लागून असलेल्या साेलापूर जिल्हा परिषदेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून गावपातळीवर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेणे, चाचणी करण्यास भाग पाडणे, नियमांची अंमलबजावणी हाेते की नाही, यावर लक्ष ठेवले जात आहे. साेलापूर जिल्ह्यातील शिक्षकांकडून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काेट...
समाजामध्ये शिक्षकांना मानाचे स्थान आहे. हीच बाब लक्षात घेऊन काेराेनाच्या अनुषंगाने जनजागृती करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांना किमान टेस्ट करून घेण्यासाठी प्राेत्साहित केल्यास लाेक निश्चित ऐकतील. हे केवळ शिक्षकांसाठीच नाही तर गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनीही पुढाकार घेतल्यास आराेग्य यंत्रणेला निश्चित मदत हाेईल.
-डाॅ. विजयकुमार फड, सीईओ, जिल्हा परिषद, उस्मानाबाद