बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर परिसरातील एकुरगा, कडदोरा, समुद्राळ, रामपूर, जकेकूर, येळी, कलदेव निंबाळा, काळनिंबाळा आदी भागात ऐन सोयाबीनच्या काढणीतच मागील चार-पाच दिवसांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही सोयाबीन पाण्यात जाईल या भीतीने शेतकरी सध्या सोयाबीन काढणीसाठी धावपळ करताना दिसत आहेत.
यंदा कधी नव्हे तो सोयाबीनचा ११ हजारांच्या वर गेला असून, सुरुवातीच्या पेरणीनंतर मुबलक पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती. दर वाढल्याने शेतकऱ्यांनी अडचणीतूनही आर्थिक जुळवाजुळव करीत सोयाबीन पिकाला दोन-तीन वेळी कीटकनाशक फवारणी, अंतर्गत मशागती, खुरपणी करून भरपूर मेहनत घेतली. यानंतर फळधारणेच्या भरात पावसाने उघडीप दिल्याने, रोग पडल्याने फळधारणेवर परिणाम होऊन उत्पन्नातही घट येत आहे. त्यातच आता दरही पाच हजारावर आला. सद्य:स्थितीत सोयाबीन काढणीसाठी मजुरांना एकरी ४ हजार २०० रुपये ते ४ हजार ५०० रुपये द्यावे लागत आहेत. त्या तुलनेत उतारा मात्र एकरी आठ ते नऊ क्विंटल मिळत असून, दरातही मोठी घसरण झाल्याने तूर्तास तरी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.