उस्मानाबाद : तेरणा सहकारी साखर कारखाना दीर्घमुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विहित मुदतीत केवळ तीनच संस्थांनी अर्ज खरेदी केल्यामुळे आता आणखी मुदतवाढ देण्यात आली असून, २४ सप्टेंबरपर्यंत संस्थांना अर्ज घेता येणार आहेत. यादरम्यान, आता चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यानेही तेरणा घेण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी त्यांनी अर्जही नेला आहे.
मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून नोंद असलेला तेरणा कारखाना हा केवळ मोठी ऊस गाळपाची क्षमता राखून ठेवणारा नसून, उस्मानाबादच्या राजकारणाचा लगामही हाती ठेवणारा आहे. त्यामुळेच कारखाना बंद असला तरी प्रत्येक निवडणुकीत तो ज्वालामुखीप्रमाणे बाहेर येतोच. तब्बल ३४ हजारांवर सभासद असल्याने स्वाभाविकच या कारखान्याची सूत्रे आपल्याकडे असावीत, असे राजकारण्यांना वाटते. दरम्यान, कर्जाच्या खाईत खोलवर रुतलेल्या या कारखान्याचे धुराडे पेटवून आपले कर्ज फेडून घेण्याच्या अनुषंगाने मोठ मोठे हर्डल्स पार करीत जिल्हा बँकेने अखेर निविदा प्रक्रियेपर्यंत धाव घेतलीच. हा कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहिल्यांदा १४ सप्टेंबरपर्यंत अर्ज विक्री व १५ सप्टेंबर दिवशी निविदा भरण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत चारच संस्थांनी अर्ज नेले होते. आणखी स्पर्धा वाढावी या हेतूने निविदेत काही बदल करून अर्ज विक्री व स्वीकृतीस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक संस्थांना २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज घेता येणार आहे. या वाढीव मुदतीत आणखी कोण इच्छा प्रदर्शित करते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिवाय, हा कारखाना कोणाच्या पदरात जातो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
चार संस्थांनी नेले अर्ज...
निविदा प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजतागायत केवळ चार संस्थांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये मेयर कमोडिटीज, ट्वेंटी वन शुगर्स, डीडीएन एसएफए व चोराखळी येथील धाराशिव कारखान्याने अर्ज नेले आहेत. आता उर्वरित आठवडाभरात आणखी किती जण अर्ज नेतात याकडे सभासदांचे लक्ष असणार आहे. ५ ऑक्टोबरला प्राप्त निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यामुळे ५ तारखेकडेही नजरा लागून आहेत.
हंगाम लवकर सुरू होणार..?
तेरणा कारखाना याच वर्षीच्या हंगामात सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू होते. पीएफ कार्यालयाचा मोठा अडथळा दूर झाल्यानंतर लागलीच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मुदतवाढ मिळाल्याने आणखी १५ दिवस लांबणीवर गेले आहेत. निविदा उघडल्यानंतर ज्या कोण्या संस्थेच्या ताब्यात कारखाना जाईल, त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे व हंगामाचे नियोजन करण्यास वेळ लागणारच आहे.