शासनाच्या आदेशानुसार सोमवारी रात्रीपासून श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. परंतु, मंगळवार हा देवीचा वार असल्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी तुळजापुरात दाखल झाले होते. यावेळी प्रशासनाने त्यांना मज्जाव केला. जिल्हाधिकाऱ्यांनी अत्याव्यशक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. परंतु, दुकानदारांनी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडली. त्यामुळे पालिका व पोलीस कर्मचाऱ्यांनी आवाहन करून दुकाने बंद करण्यास लावली. यानंतरही काही व्यवसायिक बंद पडद्याच्या आडून भाविकांना प्रसादाची विक्री करीत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, मंदिर बंद असल्यामुळे दिवसभर महाद्वारासमोर तसेच शहरातील इतर रस्त्यांवर देखील शुकशुकाट दिसून येत होता. परंतु, व्यापारी, व्यावसायिकामध्ये नाराजीचे सूर उमटत होते. पोलिस व पालिका प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यावर देखील दंडात्मक कार्यवाही केली.