उमरगा : अगोदरच कर्णबधिर अन् मुकबधिर, त्यातच क्षुल्लक कारणावरून आईशी भांडण करून घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकल्यामुळे गोंधळून गेलेल्या २७ वर्षीय युवतीला धीर देत पुन्हा तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन करत उमरगा पोलिसांनी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले. यासाठी पोलिसांनी तब्बल दोन दिवस शोधमोहीम राबविली.
उमरगा पोलीस ठाणे हद्दीतील डिग्गी येथील पोलीस पाटील सिद्राम जमादार यांना सोमवारी एक अनोळखी मूकबधिर मुलगी गावात फिरताना आढळली. त्यामुळे त्यांनी तिला उमरगा पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी तिच्याकडे नाव, गावाची विचारणा केली. परंतु, या मुलीला ऐकता, बोलता तसेच लिहिता-वाचताही येत नव्हते. त्यामुळे तिची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मूकबधिर विद्यालयातील शिक्षिका नानजकर यांना बोलावून व कन्नड भाषा बोलणारे होमगार्ड शेळके तसेच डिग्गीच्या पोलीस पाटील आदींची मदत घेऊन तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
तिने केलेल्या खाणाखुणा व कर्नाटक सीमेवरील डिग्गी येथे ती आढळून आल्यामुळे कर्नाटकमधील आळंद किंवा कलबुर्गी येथील ती असावी, असा कयास लावून पोलिसांनी तिचे फोटो सीमेवरील बसवकल्याण, आळंद, हुमनाबाद, कलबुर्गी येथील पोलीस स्टेशनच्या ग्रुपवर शेअर केले शिवाय, कलबुर्गी व बिदर जिल्ह्यातील मिसींग मुलीचा शोध घेतला तसेच पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी पो. कॉ. ए. के. गांधले, महिला पो.कॉ. एस. के. कंदले व डिग्गीचे पोलीस पाटील सिद्राम जमादार यांचे पथक तयार करून त्यांना कलबुर्गी व आळंद येथे पाठविले. मुलीने सांगितलेल्या ठिकाणी नेऊन त्या परिसरातील नागरिकांशी चर्चाही केली. परंतु, तिथेही तिला कोणी ओळखले नाही. यामुळे पोलीस प्रशासनही हातबल झाले होते.
दरम्यान, या मुलीला पुन्हा उमरगा येथे आणून कोरोना व तिच्या अंगावरील जखमांच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करून तिला लातूर येथील महिला व बालविकास आयुक्तालय शासकीय विद्या महिला वसतिगृहात दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला) परंतु, त्यांनीही या मुलीला स्वीकारण्यास असहकार्य केले. त्यामुळे पोलिसांना या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे मंगळवारी पोलीस पथक पुन्हा या शोधमोहिमेला लागले. पोना व्ही. के. मुंडे यांनी या मुलीसोबत खाणाखुणांनी संवाद साधत ती सांगेल त्या मार्गाने जाऊन तिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. याच रात्री पुन्हा तिला वैद्यकीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले अन् याच ठिकाणी तेथील रुग्णवाहिका चालकाकडून या मुलीचा पत्ता पोलिसांना मिळाला. पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून तातडीने मुलीचा भाऊ व मावशी यांना बोलावून घेऊन बुधवारी या मुलीस त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेली पोलिसांची ही शोधमोहीम अखेर यशस्वी ठरली.
चौकट.....
क्षुल्लक कारणावरून भांडण करून सोडले होते घर
रुग्णवाहिका चालकाने सदर मुलीचे नाव कावेरी राजकुमार मुत्ते असून, ती बसवकल्याण येथील रहिवाशी असल्याचे व सध्या तिचे कुटुंबीय उमरगा तालुक्यातील हिप्परगा (राव) येथे राहत असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी त्या मुलीचा भाऊ अनिल राजकुमार मुत्ते व मावशी पार्वती स्वामी यांना बोलावून घेतले. यावेळी पार्वती स्वामी यांनी सदर मुलगी क्षुल्लक कारणावरून आईशी भांडण करून घरातून निघून गेली होती. परंतु, रस्ता चुकल्यामुळे ती भटकत राहिल्याचे सांगितले. सदर मुलगी ही दगड धानोरा येथे मावशीकडेच राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती आईकडे राहावयास गेली होती.