पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी येथील विश्वनाथ व काशीनाथ चव्हाण या दोघा पिता-पुत्रांत ५ मार्च रोजी चव्हाणवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाद चालू होता. या वेळी गावातील पोलीस पाटील शत्रुघ्न हरिदास चव्हाण व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत सुभाष चव्हाण या दोघांनी मिळून पिता-पुत्रामध्ये चाललेले हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी विश्वनाथ चव्हाण याने ‘तुम्ही मला समजावून सांगणारे कोण’ असे म्हणत पोलीस पाटील व तंटामुक्त समिती अध्यक्षांना धमकावत मारहाण केली. तसेच हातास चावा घेऊन जखमी केल्याची फिर्याद पोलीस पाटील शत्रुघ्न चव्हाण यांनी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याच प्रकरणात विश्वनाथ चव्हाण यांनीही फिर्याद दाखल केली. यानुसार शत्रुघ्न हरिदास चव्हाण व हणमंत हरिदास चव्हाण या दोघा बंधूंनी शेतीविषयक वादावरून विश्वनाथ चव्हाण यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्याने तसेच वेळूच्या काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. विश्वनाथ चव्हाण यांच्या या फिर्यादीवरून शत्रुघ्न चव्हाण व हणमंत चव्हाण या दोघा बंधूंविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.