व्यथा घरकुलाच्या - भाग २
बालाजी आडसूळ
कळंब : येथील पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ९१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात यंदा रमाई आवास योजनेतून दोन हजार घरकूल मंजूर आहेत. एवढ्या मोठ्या संख्येन असलेल्या या घरकुलाचा ‘डोलारा’ केवळ तीन कर्मचारी सांभाळत आहेत. याचाही लाभार्थ्यांना फटका बसत असून, याकडे कोणी लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ज्यांच्याकडे पक्के घर नाही, अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासन सध्या ‘मिशन’ मोडवर घरकूल बांधणीचा कार्यक्रम राबवत आहे. यातून प्रत्येक पात्र कुटुंबास हक्काचं घरकूल मिळावं, असा शासनाचा प्रयत्न आहे. या घरकुलाच्या बांधकामासाठी कालमर्यादीत ‘डेडलाईन’ दिलेली आहे.
जिल्हा परिषद, ग्रामविकास यंत्रणा यासाठी पंचायत समिती स्तरावर सातत्याने ‘फॉलोअप’ घेत आहे. पंचायत समितीही आपल्या घरकूल कक्षातील कर्मचारी, विस्तार अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना कायम ‘अलर्ट’ मोडवर ठेवत आहे. असे सर्व काही आलबेल चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात घरकूल योजनेचा आलेख म्हणावा असा वृद्धींगत झालेला दिसत नाही.
उद्दिष्टाइतपत मंजुरी, मंजूर झालेल्यांचे रेखांकन, तद्नंतर भौतिकदृष्ट्या झालेले काम, यानुसार अनुदान हप्त्यांचे वितरण आदी मुद्द्यांवर ‘प्रोग्रेस’ पाहिला असता घरकुलाच्या कामांनी म्हणावी तशी गती घेतलेली नाही. पंचायत समितीचा घरकूल कक्ष अगदी सुटीच्या दिवशी काम करत असतानाही हे चित्र आहेे. यामुळेे ग्रामपातळीवर यासंबंधी ‘प्रॉपर’ काम होत नसल्याचा सूर आळवला जात आहे.
दुसरीकडे पंचायत समितीच्या घरकूल कक्षात असलेेले अपुरे मनुष्यबळही या दप्तरदिरंगाईस कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध यंत्रणेवर कामाचा ताण वाढला जात आहे. संचिकांचा प्रवास मंदावत आहे. यात पुन्हा महाग्रारोहयो कक्षाशी संबंधित रोजगार सेवकांनी ‘ब्रेक’ लावला आहे. या सर्वाचा परिपाक म्हणूनच घरकूल लाभार्थ्यांना आपली हक्काची रक्कम वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
चौकट...
दोन हजार घरकुलांचा तीन कर्मचार्यांवर भार...
तालुक्यात आर्थिक वर्ष २०१९ - २० मध्ये रमाई आवास योजनेत १ हजार ९५४ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. आजवरचे हे सर्वात जास्त उद्दिष्ट आहे. सदर कामे कालमर्यादेत पूर्ण करावयाची आहेत. यासाठी पंचायत समितीच्या घरकूल विभागात चार बाह्य अभियंता, एक लिपीक व एका डाटा एन्ट्री चालक अशा मनुष्यबळाची गरज आहे. तसा आकृतीबंधच आहे. जिल्हा परिषदेचे आठ गट असून, एका बाह्य अभियंत्यांकडे किमान दोन गटांचा भार अपेक्षित आहे. यातील एका बाह्य अभियंत्यावर नुकतीच कार्यवाही झाली आहे. यामुळे सद्यस्थितीत केवळ एक बाह्य अभियंता, एक क्लर्क व एक डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत आहे. यांनाच हजारो घरकुलांचे कामकाज सांंभाळावे लागत आहे.
उद्दिष्ट दिलं, मनुष्यबळ कोण देणार ?
पंचायत समितीमध्ये घरकूल विभागात सध्या कार्यरत असलेले तिघे कर्मचारी घरकुलाच्या हजारावर कामाचा डोलारा सांभाळत आहेत. यातच लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा महाग्रारोहयो विभागाचा अतिरिक्त भार आहे. यामुळे कामाचा अधिकच ताण वाढत आहे. यामुळे पंचायत समितीने सध्या काम नसलेल्या आपल्या अधिनस्त इतर विभागांचे मनुष्यबळ प्रतिनियुक्तीवर घेणे गरजेचे आहे किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस बाह्य अभियंता पुरवण्याचा ठेका घेतलेल्या त्या यवतमाळकर संस्थेने पुरेसे मनुष्यबळ पुरवले पाहिजे. परंतु, याकडे ना अधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना कोण्या पदाधिकाऱ्यांचे. यामुळे हाल होताहेत ते गोरगरीब लाभार्थ्यांचे.
प्रतिक्रिया
घरकूल विभागात एकूण ४ बाह्य अभियंता, एक क्लर्क, एक ऑपरेटर अशी मनुष्यबळाची गरज आहे. त्यापैकी सध्या प्रत्येकी एक याप्रमाणे ऑपरेटर, क्लर्क व अभियंता असे एकूण तीन कर्मचारी कार्यरत आहेत. यातील एकाकडे नरेगाचा अतिरिक्त पदभार आहे. रमाई आवास योजनेेेच्या १४८६ पैकी ११०० लाभार्थ्यांचा पहिला, तर ६८ लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता सोडण्यात आला आहे.
- एन. पी. राजगुरू, गट विकास अधिकारी, कळंब
" ऑप्शनल तक्ता (जागेनुसार ) कळंब पंचाय समिती रमाई आवास योजना सन उद्दिष्ट मंजुरी २०१६-१७ १८३ १८३ २०१७-१८ ३२८ ३२८ २०१८-१९ ३२८ ३२८ २०१९-२० १९५७ १४८६ एकूण २७९६ २३९०