रस्त्यावर वाहन उभे करणे आले अंगलट
उस्मानाबाद : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कळंब तालुक्यातील इस्मामपूर येथील शेख गफार तांबोळी यांनी १८ फेब्रुवारी रोजी ढोकी येथील पेट्राेलपंपासमाेरील चौकात चारचाकी वाहन (क्र. एमएच. २५ एजे ३२३९) उभे केल्याचे ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकास आढळून आले. यावरून पोलिसांनी तांबोळी यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.
४५८ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४५८ वाहनचालकांवर पोलीस पथकाने १८ फेब्रुवारी रोजी कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यातील विविध मार्गांवर १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून १ लाख ३ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
दारू अड्ड्यावर धाड; एकाविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने १८ फेब्रुवारी रोजी हातलादेवी परिसरात धाड टाकली. यावेळी उस्मानाबाद येथील किरण काळे याच्याजवळ एका बॅरेलमध्ये २०० लिटर गावठी दारूनिर्मितीचा द्रवपदार्थ आढळून आला. पोलीस पथकाने हा द्रवपदार्थ ओतून नष्ट केला. संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिराढोण येथे जुगार अड्ड्यावर छापा
उस्मानाबाद : शिराढोण पोलीस ठाण्याच्या पथकाने १७ फेब्रुवारी गावातीलच एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात शिराढोण येथील दयानंद यादव, नितीन यादव व परभणी येथील दिगंबर चव्हाण हे ऑनलाइन कल्याण, मुंबई मटका जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी जुगार साहित्य जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.