लोहारा : लोहारा तालुक्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण धानुरी येथे २ एप्रिल २०२० रोजी सापडला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून, मागील वर्षभरात रुग्णांचा हा आकडा ९१५ पर्यंत जाऊन पोहोचला. शिवाय, या आजाराने २२ जणांचा बळी घेतला. अजूनही तालुक्यात ११३ रुग्ण ॲक्टिव्ह असून, नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोनाविषयी नागरिकांत कमालीची भीती निर्माण झाली होती. त्यात २ एप्रिल २०२० मध्ये तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण धानुरी येथे आढळून आला. हा रुग्ण मुंबईहून गावी आला होता. यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला. यानंतर तर नागरिकांत चांगलीच भीती निर्माण झाली. बहुतांशजणांनी स्वत:ला घरात बंद करून घेतले होते. गावागावांत स्मशान शांतता पसरली होती. त्यानंतर रुग्णांचा आलेख वाढतच गेला.
दरम्यान, मध्यंतरी कोरोना आटोक्यात आला होता; परंतु मागील दोन महिन्यांपासून पुन्हा सर्वत्र रुग्णसंख्या वाढत आहे. आजघडीला तालुक्यात ११३ रुग्ण ॲक्टिव्ह असून, प्रशासनाकडून विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शिवाय गावागावांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणदेखील सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे.
शहरात २२ रुग्ण
तालुक्यात सद्य:स्थितीत ११३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात लोहारा शहरात २२, कानेगाव १९, तर जेवळीत १३ रुग्ण असून, यातील ३९ जण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये, ४३ होम आयसोलेशन, १६ तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात, नऊजण उमरग्यात, दोघे जिल्हा रुग्णालयात २, तर चौघे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जागा बदलून बाजार सुरूच
लोहारा शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना स्थानिक प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असले तरी येथे मात्र प्रत्येक शुक्रवारी जागा बदलून कमी-अधिक प्रमाणात आठवडी बाजार सुरूच आहे.
कोट..........
तालुक्यात सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार साबण, पाण्याने हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे आदी नियम काटेकोरपणे पाळावेत. टेस्टिंग करून घ्यावी. अंगावर दुखणे काढू नये. तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी.
- डॉ. अशोक कटारे,
तालुका आरोग्य अधिकारी, लोहारा.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकरण बाहेर पडू नये. गर्दी करू नये. नियमांचे पालन करावे. यासंदर्भात जनजागृतीसोबतच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
- संतोष रुईकर,
तहसीलदार, लोहारा