उस्मानाबाद : पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर मिळणेही रुग्णांना कठीण होत होते. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे एकूण बेडच्या १० टक्के बेडवरच रुग्ण आहेत. यात ऑक्सिजनवर केवळ १६१ रुग्ण आहेत. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झालेली आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांत कोरोनाची पहिली लाट धडकली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने रुग्णांना बेड मिळणेही कठीण होत होते. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात ९७४ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आलेली होती. ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण हजाराच्या घरात राहत. त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी रुग्ण, नातेवाइकांना वेळप्रसंगी शेजारील जिल्ह्याची वाट धरावी लागत असे. अनेक रुग्णांना बेड मिळेपर्यंत रुग्णवाहिकेतच थांबून राहावे लागे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या खाली आली आहे. सध्या ९७४ ऑक्सिजन बेडपैकी १६१ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.
८१३ बेड रिकामे आहेत. क्रिटिकल रुग्णांसाठी आयसी बेड निर्माण करण्यात आलेले आहेत. २६३ बेडपैकी १११ बेडवर रुग्ण आहेत, १५२ बेड रिकामे आहेत. सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी विविध रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार ३१४ बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी केवळ ४१५ रुग्ण उपचाराखाली आहेत, तर ३ हजार ८३९ बेड रिकामेच आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने तूर्तास तरी आरोग्य विभागावरील ताण कमी झाला आहे.
ऑक्सिजन लागू लागला कमी
मार्च ते मे या तीन महिन्यांत रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत होता. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. जिल्ह्यास ओटूवर असलेल्या रुग्णांना प्रतिदिन १७ ते १८ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. सध्या जिल्ह्यास ६ ते ७ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे.