याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमरगा शहरासाठी बाह्यवळण रस्ता करण्यात आला, मात्र या मार्गावरून कोरेगाव, त्रिकोळी व मुळज गावांकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावा लागतो. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरग्यातील व्यंकट घोडके हे जवळपास ६५ शेळ्या-मेंढ्या घेऊन घराकडे निघाले होते. रस्ता ओलांडत असताना घोडके यांनी ट्रकचालकाला हात करून थांबविण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने ट्रक तसाच पुढे नेल्याने ट्रकखाली पंधरा शेळ्या चिरडल्या गेल्या. दरम्यान, महामार्ग प्राधिकरण व एसटीपीएल ठेकेदारावर संताप व्यक्त करत नागरिकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांनी पळून गेलेल्या ट्रकचालकावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून लोकांची समजून काढली. त्यामुळे दीड तास ठप्प झालेली वाहतूक सव्वानऊला सुरू झाली.