सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला एकतर्फी मात देत विश्वविक्रमी जेतेपदाला गवसणी घातली. ऐतिहासिक कामगिरीनंतर सूर्यकुमार यादवनं स्पर्धेची सुरुवात मनासारखी झाली नव्हती हे सांगितले होते. आता त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर ८ मधील लढतीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियानं केलेल्या दमदार कमबॅक मागची खास आणि रंजक गोष्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाच्या कर्णधाराने शेअर केली कमबॅकची खास स्टोरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा सेमीचा प्रवास खडतर झाला होता. पण उर्वरित दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने आपल्या गटातून दुसऱ्या स्थानावर राहत सेमीत धडक मारली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सराव सत्रांमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी जाहीर केलेले बक्षीस आणि आत्मविश्वास उंचावण्यासाठी बॉलिवूडमधील काही गाणी उपयुक्त ठरली, असे भारताच्या कर्णधाराने सांगितले आहे.
अक्षर पटेल चांगलाच संतापला, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं मागितली माफी; 'त्या' सामन्याआधी काय घडलं?
१० हजार रुपयांचे बक्षीस अन् 'बाहुबली'तील गाणं
सूर्यकुमार यादव म्हणाला की, "पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांचं योगदान खूप महत्त्वाचं असतं. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी सरावात सर्वोत्तम क्षेत्ररक्षकासाठी १०,००० रुपयांचं बक्षीस ठेवले. दक्षिण आफ्रिका सामन्यानंतर व्हिडिओ विश्लेषकाने आम्हाला मागील दोन वर्षांचा दहा मिनिटांचा व्हिडिओ दाखवला. फलंदाजांसाठी ‘बाहुबली’ गाण्यावर एक रील आणि गोलंदाजांसाठी ‘ओ शेरा तीर ते ताज’ गाण्यावर दुसरी अशा छोट्या क्षणांनी संघ अधिक मजबूत होत गेला."
मजेशीर कॅरेक्टर
ड्रेसिंग रूममध्ये पारदर्शकता आणि मोकळेपणाचे महत्त्व अधोरेखित करताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, प्रत्येकाचं मत जाणून घेणं गरजेचं असतं. मी प्रत्येक खेळाडूशी जवळून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. तणावाचे क्षणही कधी कधी मजेशीर ठरायचे. रिंकू ज्यावेळी इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळी सर्वांनाच हसू अनावर व्हायचे. तिलक वर्माची हैदराबादी बोलीही ताफ्यात एक वेगळ वातावरण निर्माण करायची, ही गोष्टही त्याने शेअर केली आहे.