सेलू : युवकांच्या नृत्य, अदाकारी व कसदार अभिनयामुळे युवक महोत्सवात अख्खी तरुणाई सळसळली़ सेलू येथील श्री साई नाट्य मंदिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत कै़ वामनराव कदम बोर्डीकर सेवा संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले़ युवक महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ़ अशोक ढवण यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुरेश कोरडे, प्राचार्य डॉ़ शरद कुलकर्णी, मिलिंद सावंत, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आश्रोबा डख, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, प्रा़ महेश देशमुख, डॉ़ पाटील, प्राचार्य उदय खोडके, आशा देशमुख आदींची उपस्थिती होती़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील विविध कृषी महाविद्यालयातील युवक व युवतींनी कसदार अभिनय व नृत्याविष्काराने सेलूकरांना मंत्रमुग्ध केले़ या युवक महोत्सवात १५ लोकनृत्य, मुकाभिनय, विडंबन, एकांकिका सादर करण्यात आल्या़ तसेच वैयक्तिक नृत्य स्पर्धेत परभणीच्या युवक व युवतींनी अप्रतिम नृत्य सादर केले़ प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित तरुणाईने वन्स मोअरची हाक दिली़ रविवारी उशिरापर्यंत युवक महोत्सवाचे विविध कार्यक्रम सुरू होते़ (प्रतिनिधी)उद्घाटनाला दोन तास उशीरयुवक महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता होणार होते़ मात्र परभणीच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना सेलूत येण्यासाठी विलंब झाला़ परिणामी ११ चा कार्यक्रम दुपारी १ वाजता सुरू झाला़ सादरीकरणासाठी आतूर झालेले युवक व युवती यांचा चांगलाच हिरमोड झाला़ त्यामुळे उशिरापर्यंत कार्यक्रम संयोजकांना घ्यावा लागला़ दरम्यान, सेलूच्या साईनाट्यगृहाचा परिसर तरुणाईच्या उपस्थितीमध्ये फुलून गेला़ या युवक महोत्सवात ४०० युवक, युवतींनी सहभाग घेतला़ उशिरापर्यंत कार्यक्रम सुरूच होते़
तरुणाईच्या नृत्याविष्काराने युवक महोत्सवात रंगत
By admin | Updated: September 14, 2014 23:37 IST