पाचोड : सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने पैठण तालुक्यातील आंतरवाली खांडी गावातील युवा शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आयुष्य संपविले आहे. गणेश दत्तात्रय हांडे (३५, रा. आंतरवाली खांडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोडपासून जवळ असलेल्या आंतरवाली खांडी येथील गणेश दत्तात्रय हांडे (३५) यांना अडीच एकर शेती आहे. घरात वयोवृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एक भाऊ आहे; पण तो कामासाठी बाहेरगावी असतो. घरचा कारभार गणेश यांच्या हाती होता. तीन वर्षांपासून शेतात काहीच पिकत नव्हते. शेतीत लावलेला खर्चदेखील निघत नसल्याने गणेश हवालदिल झाले होते. त्यात एका बँकेकडून त्यांनी शेतीवर पीककर्ज काढले होते; पण सतत दोन वर्षांपासून नापिकी व आता अतिवृष्टीमुळे शेतातील होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कर्जाची परतफेड कशी करावी, वर्षभर कसे जगावे, अशी चिंता त्यांना सतावत होती. याबाबत त्यांनी सातत्याने घरच्यासमोर बोलून देखील दाखविले. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता गणेश हांडे हे शेतात जातो म्हणून घराबाहेर पडले आणि शेतात गेल्यावर एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपविले. सकाळी दहा वाजेच्या सुमारास गणेश हांडे यांचे काका शेतात कामानिमित्त गेले. तेव्हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गणेश दिसून आले. त्यांनी त्वरित गावातील लोकांना बोलावले. गावचे सरपंच अरुण कळमकरसह गावकरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलविला. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी शवविच्छेदन केले. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.