घाटशिळ पारगाव : शिरूरकासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्यासाठी गुरुवारी महिलांनी पदर खोचून ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला. त्यामुळे गाव दणाणून गेले. घाटशिळ पारगाव येथे मागील महिनाभरापासून पाण्यावाचून लोकांचे हाल आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिला, पुरूष, लहान मुलांना रानोमाळ भटकावे लागत आहे. सकाळी साडेआठ वाजता गावातील २०० महिलांनी वाजतगाजत ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला. ग्रा.पं.च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जनाबाई खरात, जयश्री जाधव, सत्यभामा कोल्हे, अनूसया घोडके, साखराबाई केदार, राधाबाई खेडकर, सरस्वती खेडकर, रखमाबाई केदार, भागूबाई निकाळजे, कांताबाई खेडकर आदींचा सहभाग होता. ग्रामसेवकास निवेदन दिले.(वार्ताहर) सरपंच म्हणाल्या, आधी पाणीपट्टी भरा.. याबाबत सरपंच वैशाली पांडुरंग नेहरकर म्हणाल्या, पाणीटंचाई फक्त घाटशिळ पारगाव येथेच आहे, असे नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाण्यासाठी आंदोलन करणार्यांनी आधी पाणीपट्टी भरावी, असा सल्ला त्यांनी दिला. पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. तीन योजना राबवूनही ठणठणाट घाटशिळ पारगाव येथे जलस्वराज्य, स्वजलधारा योजना , दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात आल्या. परंतु या उपरही गावात पाण्याचा ठणठणाट आहे. कोट्यावधीचा निधी खर्च करूनही डोईवरचा हंडा खाली आलेला नाही.
घाटशिळ पारगावमध्ये पाण्यासाठी महिला रस्त्यावर
By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST