उस्मानाबाद : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न व अडचणी सोडवून घेण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रत्येक महिन्याला जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो़ जिल्ह्यात गेल्या सतरा महिन्यांपासून हा उपक्रम राबविला जात असला तरी आतापर्यंत केवळ चार तक्रारी या उपक्रमांतर्गत प्रशासनाकडे दाखल झाल्या असून त्यातील तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. एका तक्रारीची चौकशी सुरु आहे. त्यामुळे ज्यांच्यासाठी हा उपक्रम आयोजिला जातो, त्या महिलांनीच याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ४ मार्च २०१३ पासून या महिला लोकशाही दिनाचा शुभारंभ झाला. तालुका, जिल्हा, विभागीय आणि मंत्रालयीन स्तरावर हा महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडता याव्यात. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिनात महिलांनी दाखल केलेल्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेने तातडीने दखल घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी, जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, विभागस्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आणि राज्यस्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो़ या जिल्ह्यात मात्र सदर उपक्रमास अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे आजवर दाखल झालेल्या तक्रारींच्या संख्येवरून दिसून येते. जिलह्यात गेल्या सतरा महिन्यांपासून हा उपक्रम राबविला जात असून, या कालावधीत केवळ चार महिलांनी यात तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने यातील तीव्र तक्रारी निकालीही काढण्यात आल्या आहेत. एकीकडे पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी पाहता जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबाबत महिलांचीच उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या उपक्रमाबाबत आणखी जनजागृती करून पिडीत महिलांना तक्रार करण्यासाठी पुढे आणण्याची गरज व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (१ सप्टेंबर) जिल्हास्तरीय लोकशाही दिन उपक्रम राबवण्यिात आला. जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलिस प्रमुख अभिषेक त्रिमुखे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर आणि घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शिरीष बनसोडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख मगर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी लोकशाही दिनासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधितांना त्याची सोडवणूक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, जिल्हास्तरीय लोकशाही दिन उपक्रमास सर्वशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र अनेक कर्मचारी, अधिकारी यावेळी अनुपस्थित रहात असल्याचे मागील लोकशाही दिनाच्या उपक्रमावरुन दिसून येते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभिर दखल घेतली आहे. या अशा विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
महिला लोकशाही दिन नावालाच
By admin | Updated: September 2, 2014 01:51 IST