पंकज जैस्वाल , लातूरराज्यात शांत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील गेल्या तीन-चार वर्षाच्या घटनांवर नजर टाकली असता, महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल १९६ महिलांवर अत्याचार झाले़ वर्ष २०१४ मध्ये ८९६, वर्ष २०१३ मध्ये ६२१ आणि वर्ष २०१२ मध्ये ४६८ महिलांवर अत्याचार झाले आहेत़ खून, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी, जाच-जुलूम, आत्महत्येस प्रवृत्त करणे, मुलींना व महिलांना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, याचा आलेख पाहिल्यास थरकाप होतो आहे़ विशेषत: गतवर्षी आणि गेल्या तीन महिन्यातील गुन्ह्याचे आकडे पाहिल्यास महिलांची सुरक्षा हा विषय निश्चितच सामाजिक चिंतेची बाब बनली आहे़गेल्या सव्वातीन वर्षात जिल्ह्यातील १८२ महिलांना प्राणास मुकावे लागले आहे़ तर ८० महिलांच्या खुनाचा प्रयत्न झाल्याची नोंद पोलिस दफ्तरी आहे़ प्राणास मुकलेल्या १८२ पैकी ४३ महिलांचा केवळ हुंड्यासाठी खून झाला़ १७ महिलांनी हुंड्याच्या छळास कंटाळून स्वत:चे जीवन संपविले़ तर आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे ८२ महिलांनी स्वत:चा जीव दिला आहे़ ४० जणींचा विविध कारणांसाठी खून झाला़ खुनाच्या घटनेपाठोपाठ विनयभंगाच्या व बलात्काराच्या घटनांतही लक्षणीय वाढ झालेली आहे़ गेल्या सव्वा तीन वर्षात ११९ महिलांवर बलात्कार झाले़ त्यापैकी मागच्या तीन महिन्यात ११, गतवर्षी ५५, वर्ष २०१३ मध्ये ३३ तर वर्ष २०१२ मध्ये २० महिलांवर बलात्कार झाले आहेत़ विनयभंगाच्या ३९५ घटनांपैकी गेल्या तीन महिन्यात ४३, गतवर्षी १९६, वर्ष २०१३ मध्ये ९८ तर वर्ष २०१२ मध्ये ५८ घटनांची नोंद आहे़ मुलींना व महिलांना पळवून नेण्याच्या घटनेतही वाढ आहे़ तब्बल १३५ महिला गेल्या साडे तीन वर्षात गायब झाल्या आहेत़ त्यापैकी गेल्या तीन महिन्यात १८ मुलींना पळवून नेले़ गतवर्षी ५८, वर्ष २०१३ मध्ये ३२, वर्ष २०१२ मध्ये २७ महिला व मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत़ गेल्या सव्वा तीन वर्षात ८८० विवाहितांचा जाच-जुलूम करुन छळ केल्याच्या तक्रारी आहेत़ महिलांसोबत बिभत्स कृत्य व अंगविक्षेप केल्याच्या ३२० तक्रारी आहेत़ महिलांचा अनैतिक व्यापार कलमांतर्गत ११, कौटुंबीक हिंसाचार कायदा २००५ अंतर्गत १, बालविवाह लातूरच्या पोलिस दलातील गृह विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ़ अश्विनी पाटील म्हणाल्या की, घटना यापूर्वीही घडत होत्या़ परंतु बदनामीच्या भितीने व कायद्याचे अज्ञान असल्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते़ जनजागृती झाल्यामुळे व कायद्यात केलेल्या बदलामुळे पीडित महिला त्यांच्या अत्याचारावरील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी पुढे येत आहेत़ पोलिसांकडून न्याय मिळेल, असा आशावाद महिलांना वाटतो आहे़ तसेच महिलांच्या घटनेतील नोंदीबाबत महिला व मुलींचे नाव गुपीत ठेवण्याचे कायद्याचे अभय असल्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत़ टीव्ही संस्कृती आणि मोबाईलचा वापर चांगला जितका तितका वाईटही आहे़ तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे ज्यांनी त्यांनी ठरविले पाहिजे़ तंत्रज्ञानाचा योग्य वापर हितकारक असतो़ परंतु गैरवापर महिलांसाठी धोकादायक ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या़ स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा अॅड़ स्मिता परचुरे म्हणाल्या, महिलांच्या खुनांच्या घटना पाहिल्यास बहुतांश खून हुंडाबळीशी निगडीत असल्याचे दिसून येते़ त्यातही महिलांच्या चारित्र्याबाबत संशयाचे भूत डोक्यात असल्यामुळे व लहानसहान कारणावरुन अनेक महिलांना प्राणास मुकावे लागले आहे़ मानपान व आर्थिक मागण्यांवरुनही महिलांचा नाहक छळ होतो़ सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे़ भोगलालसा वाढल्याने आणि निराधार, निराश्रीत महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची मानसिकता वाढल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत़ समाजातील विकृतींवर अंकूश ठेवणे गरजेचे आहे़ आई-वडिलांनी मुलींशी सुसंवाद ठेवून सार्वजनीक ठिकाणी तिच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या़
महिलांवरील गुन्ह्याच्या आलेखाने थरकाप !
By admin | Updated: April 4, 2015 00:34 IST