वडीगोद्री : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील गोदा पात्रातील वाळू ठेका बंद करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी तक्रार करुनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले ग्रामस्थ रास्ता रोकोसाठी औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर उतरताच पोलिस व महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधिताविरुध्द तात्काळ कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.साष्टपिंपळगाव येथील वाळू ठेका साक्षी सप्लायर्स औरंगाबाद येथील गुत्तेदाराला दिलेला आहे. परंतु हा ठेका देताना प्रशशसनाने गावात ग्रामसभा न घेता शासनाचे नियम व अटीचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसभा घेताना प्रशासनाचे अधिकारी म्हणाले होते की, या वाळू ठेक्यावर पोकलॅँड, बोट या मशिनरीला बंदी राहील.हा वाळू उपसा मजूरांनी करण्यात येईल व तीन फुट पेक्षा कमी वाळू उपसा होऊ देणार नाही. मजुरांच्या हाताला काम मिळेल म्हणून व गावातील बेरोजगारी कमी होईल म्हणून ग्रामस्थांनी वाळू उपसण्याला परवानगी दिली. पण प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी कागदावर राहिल्याने यासंदर्भात गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली असता न्यायालयाने प्रशासनाला बंद करण्यासंदर्भात आदेश दिले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वाळू ठेक्यावर जाऊन पंचनामा करुन जादा उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे व या ठेक्यात पोकलॅँडखाली एका बालकाचा दबून मृत्यु झालेला आहे.त्यामुळे हा ठेका बंद केला होता. परंतु गुत्तेदाराने पुन्हा महसूल जमा केल्याने चार महिन्यानंतर हा ठेका पालकमंत्र्यांच्या विरोध असतांनाही पुन्हा सुरु केला. गुत्तेदाराने पुन्हा शासनाचे नियम प्रणाली व अटी धाब्यावर बसवित चिमुकलीचा जीव जाऊनही महाकाय पोकलॅँड बोटीद्वारे वाळू उपसा सर्रास सुरु केला. यामुळे गावातील विहिरी, बोअर आटू लागले आहेत. पाण्याचा प्रश्नही उद्भवू लागला. तीन फुटाचे आदेश असतानाही तीस-तीस फुटाचे खड्डे खोदल्या गेल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होऊ लागली. परिणामतही शेतकऱ्यांची पिकेही धोक्यात सापडल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने देवून प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. गुत्तेदारास रोखण्याचा प्रयत्न केल्यास भाडोत्री गुंडामार्फत जिवे मारण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी ओव्हरलोड भरलेली वाहने पोलिस स्टेशनला नेऊन जमा केली.याअगोदरही ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहने पकडली. महसूल प्रशासन व वाळू गुत्तेदारात लागेबांधे असल्यामुळे महसूल प्रशासनाचे कर्मचारी कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोकोचा निर्णय घेतला. गोंदी पोलिस स्टेशनचे एपीआय अशोक घोरबांड यांनी ग्रामस्थांची समजूत घालत व महसूलचे मंडळ अधिकारी सी. एफ. मिरासे यांनी ग्रामस्थांची समजूत काढून तात्काळ वाळू ठेक्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा रास्तारोको ग्रामस्थांनी मागे घेतला. यापुढे प्रशासनाने हा वाळू ठेका बंद न केल्यास जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषणाचा इशारा गावातील नागरिक दादासाहेब काळे, आप्पासाहेब बोचरे, विलास कटारे, भाऊसाहेब पठाडे, निवृत्ती तांबडे, सरपंच अभय शेंद्रे, शहादेव औटे, रामराव शिंदे, गंगाधर जाधव आदींनी दिला आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांनी केला पंचनामा ठरवून दिलेल्या नियम व अटी कागदावर राहिल्याने यासंदर्भात गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केली असता न्यायालयाने प्रशासनाला बंद करण्यासंदर्भात आदेश दिले. असे असतानाही उपसा सुरुच असल्याने ग्रामस्थांबरोबरच महिलाही या आंदोलनात रस्त्यावर उतरल्या. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वाळू ठेक्यावर जाऊन पंचनामा करुन जादा उत्खनन झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
वाळू उपशाविरोधात महिला रस्त्यावर
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST