लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली लाकडे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहरातील तुळजाभवानीनगर परिसरातील केळना नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात सोमवारी दुपारी ही घटना घडली. अनिता मच्छिंद्र कांबळे (२८, रा. समतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीत पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली लाकडे, काड्या कोल्हापुरी बंधाऱ्यात अडकल्या आहेत. समतानगर परिसरातील अनिता कांबळे व गयाबाई पाचगे (३८) या दोघी सोमवारी दुपारी चुलीसाठी जळतन म्हणून बंधाऱ्यात अडकलेली लाकडे काढण्यासाठी गेल्या. बंधाऱ्यावरून जाताना अनिता यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात पडल्या. गयाबाई यांनी आरडाओरड केली. मात्र, जवळपास कुणीच नसल्यामुळे त्यांनी तुळजाभवानी नगराकडे धाव घेत घडला प्रकार सांगितला. परिसरातील नागरिकांनी धावत जाऊन अनिता कांबळे यांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. अनिता मागील दोन वर्षांपासून माहेरी राहत होत्या. त्यांना दीड वर्षांचा मुलगा आहे. भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक वैशाली पवार पुढील तपास करत आहेत.
जळतनाच्या लाकडासाठी महिलेने गमावला जीव
By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST