गंगाखेड : एका महिलेचे हातपाय बांधून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील तिवटगल्लीमध्ये १४ मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली़शहरातील तिवटगल्ली भागातील अनंत नानासाहेब काळे यांच्या घरी त्यांच्या पत्नी स्वाती काळे ( वय ४०) या सोमवारी दुपारी दोन ते चार दरम्यान एकट्या होत्या़ यावेळी दोन महिला व पुरूषांनी घरात प्रवेश करीत स्वाती काळे यांना धारदार शस्त्र दाखवून घरात बांधून ठेवले़ त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले़ त्यानंतर त्यांनी पळ काढला़ दुपारीचार वाजता अनंत काळे हे घरी आले असता त्यांना घराला बाहेरून कुलूप दिसले़ त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता स्वाती काळे यांचा घरातून आवाज आला़ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घराला असलेले कुलूप तोडले़ आतमध्ये जाऊन पाहिले असता स्वाती काळे या बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत दिसल्या़ त्यांना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ दरम्यान चोरीत रोख रकमेसह काळे यांच्या गळ्यातले, कानातले दागिने पळविल्याची माहिती स्वाती काळे यांनी दिली़या घटनेत किती रूपयांची चोरी झाली हे मात्र समजू शकले नाही़ रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता़ (प्रतिनिधी)
महिलेचे हातपाय बांधून लुटले घर
By admin | Updated: March 15, 2016 00:58 IST