जालना : सिंचन विहिरीचे मंजूर झालेल्या ३ लाख १५ हजार २९२ रुपयांच्या अनुदानाच्या संचिकेचे मस्टरवर मजुरांनी केलेल्या कामांची नोंद घेण्याकरीता व ते पंचायत समिती कार्यालयात जमा करण्या करीत १ हजार रुपयाची लाच घेताना कोळेवाडी येथील ग्रामरोेजगार सेवकास बुधवारी पंचायत समिती आवारातील हॉटेल मध्ये रंगेहात पकडण्यात आले.दरेगाव येथील एका शेतकऱ्यास सिंचन विहिर खोदण्यासाठी मनरेगातंर्गत ३ लाखाचा निधी मंजूर झाला. कार्यारंभ आदेशानंतर त्यांनी विहिरीचे काम सुरू केले. यासाठी गावातील १० मजूर कामावर ठेवले होते. या मजूराची मस्टरवर नोंद करण्यासाठी व त्यांना संपूर्ण मजुरी मिळण्यासाठी मस्टरवर नोंद गरजेचे होते. त्यामुळे सदर शेतकऱ्याने ग्रामरोजगार सेवक पंढरीनाथ सोपान साळवे यास भेटून मस्टरवर नोंद करण्याची विनंती केली. त्यावर साबळे यांनी मस्टर पंचायत समितीमधून आणावे लागेल व ते परत भरावे लागेल. त्यासाठी एक हजार रुपये लागतील, असे सांगितले. दरम्यान, शेतकऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून पोलिसांनी २१ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तेथील एका हॉटेलमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना साबळे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक व्ही.बी. चिंचोले, एस.एम. मेहत्रे, अशोक टेहरे आदींनी प्रयत्न केले.
लाच घेताना ग्रामरोजगार सेवकास पकडले
By admin | Updated: January 22, 2015 00:42 IST