लासूर स्टेशन : घरी आलेले पाहुणे नक्की कधी जाणार, अशी विचारणा केली असता, मुला-मुलीसह बायकोने आपल्या पतीला बेदम मारहाण केली. ही घटना सावंगी गावात मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी गोरखनाथ भावराव पोपळघट यांच्या फिर्यादीवरून पत्नी, मुलगा, मुलीवर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सावंगी येथील गोरखनाथ पोपळघट यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून पाहुणे आलेले आहेत. ही पाहुणे मंडळी नक्की कधी जाणार आहेत, असा प्रश्न गोरखनाथ यांनी त्यांच्या कुटुंबियांना विचारला. तेव्हा घरात मोठ्या आवाजात बोलाचाल सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ केल्याने त्याचे रुपांतर भांडणात झाले. पत्नी, मुलगी व मुलगा या तिघांनी मिळून गोरखनाथ यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यात जखमी झालेल्या गोरखनाथ यांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गुरूवारी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गोरखनाथ यांच्या फिर्यादीवरून पत्नी, मुलगा, मुलगी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल बी. एम. पवार पुढील तपास करत आहेत.