पांडुरंग खराबे, मंठाशहरासाठी जीवदान ठरणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम जलशुध्दीकरण योजनेच्या कामासाठी जागा अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे हे काम रखडले असल्याने यासाठी केव्हा जागा मिळेल या प्रतीक्षेत संबंिधत नळयोजनाचे काम करणारी एजन्सी आहे.मंठा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे १६ कोटी ४३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये विहीर व आदींची कामे करण्यात येत आहे. सदरील कामे पावसाळ्यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर.एम.कानडे यांनी दिली. ते म्हणाले, जलशुध्दीकरण प्लॅनसाठी पूर्वी जनावरांच्या बाजारात दिलेली जागा बदलण्यात आली. आता जुन्या पंचायत कार्यालयाच्या उत्तर दिशेला सदरील जलशुध्दीकरण प्लँट करण्याचे ठरले असून एक महिन्यापासून ग्रामपंचायत जागेबाबतचे नाहरकत व ठराव देत आहे. तो अद्यापही मिळाला नसल्याने काम सुरू करणे बाकी असल्याचे कार्यकारी अभियंता आर.एम.कानडे म्हणाले. या कामात जागा मिळत नसल्याने काम लांबत असल्याबाबत आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंठा शहरात बाराही महिने पाण्यासाठी ग्रामस्थांना सामना करावा लागतो. ही योजना पूर्ण झाल्यास सर्वत्र सहज पाणी मिळेल, अशी आशा आहे. मंठा ग्राम पंचायतने जलशुध्दीकरणासाठी जागाबाबत नाहरकत व ठराव देण्याचे कबूल केले असून मोठा विलंब त्यासाठी लागत असल्याने काम रखडले असल्याचे कार्यकारी अभियंता कानडे म्हणाले. सदरील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मार्च २०१४ मध्ये झाले होते.
पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले
By admin | Updated: September 23, 2014 23:50 IST