गणेश कुलकर्णी जालनाशहरात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, या हॉटेल्समध्ये पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे खारे लागत असून, यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची व्यक्त होत आहे. या पाण्याच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. असे असले तरी प्रशासनाच्या दप्तरी केवळ सात अधिकृत शुध्द पाणी प्रकल्पांची नोंद असून, प्रत्यक्षात मात्र यापेक्षाही अधिक लोक अनधिकृतपणे हा व्यवसाय करीत असल्याची चर्चा शहरवासियांत आहे.जालना हे औद्योगिकदृष्ट्या नावाजलेले शहर आहे. जालना हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे विविध शासकीय कामे, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शहराला नगर परिषदेकडून साधारणत: आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे व्यावसायिकांना बोअरचे किंवा विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु, अनेक हॉटेलमधील पाणी हे खारे असल्यामुळे ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. शिवाय, खारे पाणी प्यावेसेही वाटत नसल्यामुळे नागरिक बाटली किंवा पाऊचमधील पाण्याला अधिक पसंती देत आहेत. याच पार्श्वभूमीवर येथे पाणी विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. शहरात पाण्याची विक्री करणारे केवळ सात प्रकल्प कार्यान्वित असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळाली. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या शुध्द पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली जाते.
जालन्यात पाण्याच्या पैशांचे झरे..!
By admin | Updated: January 11, 2017 00:14 IST