उस्मानाबाद : जिल्ह्यात चालू वर्षात ५१ गावे व ९ वाड्यात ५६ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ८६ गावातील ११९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सोमवारी पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा आ. राहुल मोटे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तुळजापूरच्या नगराध्यक्षा विद्याताई गंगणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे व अरविंद लाटकर, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तांगडे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. चे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंधितांचे विहीर अधिग्रहण, टँकरसाठी वापरण्यात आलेल्या डिझेलची प्रलंबित रक्कम संबंधितांना तात्काळ देण्यात यावी. टँकरची मागणी आल्यास तीन दिवसात मंजुरी द्यावी. शिंगोली व रुईभर प्रकल्पातील पाणी गळती थांबविण्यासाठी पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. तात्पुरत्या नळ योजनेतील परंडा तालुक्यातील डोंजा, सोनारी व विशेष दुरुस्ती पाणी पुरवठा योजनेतील खामसवाडी येथील मंजूर कामे तात्काळ सुरु करावी. अपूर्ण विंधन विहिरींच्या कामाचा आढावा घेवून सदर कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. (प्रतिनिधी)
५१ गावे, ९ वाड्यांत ५६ टँकरद्वारे पाणी
By admin | Updated: May 20, 2014 01:14 IST