उस्मानाबाद : न्यायालयाच्या निकालाप्रमाणे फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेत तसा सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून एक हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाघोली (ता़उस्मानाबाद) सज्जाच्या तलाठी विजयमाला पंढरीनाथ ढवारे यांना ‘एसीबी’ने जेरबंद केले़ ही कारवाई सोमवारी दुपारी वाघोली येथील तलाठी सज्जा कार्यालयात करण्यात आली़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली शिवारात तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर शेतजमीन आहे़ तक्रारदार यांच्या कुटुंबियातील झालेल्या शेतीच्या वाटणीच्या कारणावरून उस्मानाबाद येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता़ या दाव्यात तक्रारदार यांच्या कुटुंबियात तडजोड होवून तसे तडजोडपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते़ त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला होता़ न्यायालयाच्या निकालाआधारे तक्रारदार यांनी सातबारा रेकॉर्डला नोंदी करण्यासाठी फेरफार होवून सातबारा मिळावा, असा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह तलाठी विजयमाला पंढरीनाथ ढवारे यांना दिला होता़ त्यावेळी तलाठी विजयमाला ढवारे यांनी न्यायालयाच्या निकालाआधारे फेरफार मंडळ अधिकाऱ्यांकडून लवकर मंजूर करून घेण्यासाठी व तसा सातबारा देण्यासाठी १५०० रूपये लाचेची मागणी केली़ शिवाय १५०० रूपये दिल्याशिवाय काम करणारच नाही, असे सांगितल्याची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबाद येथील एसीबीकडे दिली होती़तक्रार दाखल होताच उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एस़एल़मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी वाघोली येथील तलाठी सज्जा कार्यालयात सापळा रचला़ त्यावेळी तलाठी विजयमाला ढवारे यांनी तक्रारदाराकडे १५०० रूपयांची मागणी करून तडजोडीअंती १००० रूपये स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
वाघोलीच्या महिला तलाठी जेरबंद
By admin | Updated: December 28, 2015 23:23 IST