मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : कुस्ती हा खेळ पुरुषांचा समजला जाणारा असला तरी वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथील गीता जारवाल या मुलीने लग्नानंतरही कुस्ती क्षेत्रात आपली हुकुमतगाजवली आहे. सलग दोन वेळा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने ‘गोल्डन’ कामगिरी करून आपले वर्चस्व राखून तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढेही कुस्तीवर कठोर मेहनत घेण्यास तयार असून, देशाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची प्रतिक्रिया गीता जारवाल हिने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.आमिर खानचा ‘दंगल’ चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. त्यात महिला कुस्तीपटूच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला होता. यानंतर महिला कुस्तीपटूंबाबत जनसामान्यांत चर्चा सुरू झाली; मात्र असे असले तरी पूर्वीपासूनच वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडीसारख्या खेड्यातील युवा कुस्तीपटू गीता जारवाल कुस्ती क्षेत्रात आपल्या कामगिरीने राज्य स्तरावर अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.विशेष म्हणजे शहरी भागात महिला खेळाडू पुढे येत असल्या तरी ग्रामीण भागात मुलींना कुस्ती क्षेत्रात पाठविणे हे प्रवाहाविरुद्ध जाण्यासारखे काम आहे; मात्र जारवाल कुटुंबियांनी याची परवा न करताना कुस्तीत आपला ठसा उमटवणाºया गीताला पाठिंबा दिला. याच बळावर तिने २०१७ मध्ये पुणे जिल्ह्यातील कळंबा येथील राज्य कुस्ती स्पर्धेत ६६ किलो वजन गटात जबरदस्त कामगिरी करताना सुवर्णपदकावर ताबा मिळविला. यानंतर याच वर्षी गत महिन्यात नागपूर येथे झालेल्या वरिष्ठ राज्य महिला कुस्ती स्पर्धेत तिने कामगिरीत सातत्य राखताना ६९ किलो गटात प्रतिस्पर्धी खेळाडूला धूळ चारून गोल्डची कमाई करीत स्पर्धेत वेगळी ओळख निर्माण केली.विशेष म्हणजे विवाहानंतर तिने दुसºया सुवर्णपदकावर आपले नावे कोरले. यासाठी पतीसह सासरच्या मंडळींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे यश संपादन करू शकले, अशी प्रतिक्रिया तिने दिली. यापुढेही कठोर मेहनत करण्यास तयार असून, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया गीता हिने व्यक्त केली. सध्या नालेगाव येथील भागीरथी शाळेतील मुख्याध्यापक बी.एम. हजारे, क्रीडा शिक्षक भरत निंबाळकर तिच्या खेळावर परिश्रम घेत आहेत. गीता एक दिवस नक्कीच आपल्या गावाचे नाव देशात पुढे आणील, असा विश्वास हजारे, निंबाळकर यांनी व्यक्त केला.महिलांसाठी आखाडे नसताना मिळविले यशआता महिलाही कुस्तीकडे वळू लागल्या आहेत; मात्र पुरुषांप्रमाणे महिलांसाठी आखाडे नाहीत, तसेच महिला प्रशिक्षकांचीही वानवा आहे. खेड्यापाड्यातही अनेक प्रतिभावंत कुस्तीपटू आहेत; मात्र पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचा वरिष्ठ स्तरावर निभाव लागत नाही. अशा परिस्थितीत गीता जारवाल हिने मिळविलेले यश वाखणण्याजोगे आहे.
वैजापूरच्या ‘दंगल गर्ल’चा कुस्तीत बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:02 IST