औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून कोरोनायोद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. आता या आठवड्यात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे महसूल, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका अधिकारी-कर्मचारी आदींना लस देण्यात येणार आहे.
कोरोना लढाईत आघाडीवर फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला जात आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी सध्या दिल्या जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासाठी यापूर्वी ३४ हजार डोस मिळाले होते. आता आणखी ३६ हजार डोस प्राप्त झाले आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील लसीकरणासाठी डोसचे वितरणही केले आहे.
औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यांसाठी ६३ हजार ६४० डोस मिळाले आहेत. यात औरंगाबादसाठी ३६ हजार डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली. या आठवड्यात फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येणार आहे. महापालिकेला आणखी १५ हजार डोस मिळाले आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात लसीकरण
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात फ्रंटलाईन वर्कर्संना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.