परतूर: दुधना नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून ती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर गावकऱ्यांनीच पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केले. हा प्रकार रविवारी घडला. परतूर तालूक्यात सतत दुधना व गोदावरी पात्रातून वाळू चोरीचे प्रकार सुरू आहेत. या वाळू पट्टयावर पोलिस व महसूल यांचे नियंत्रण आहे. मात्र पोलिसांनी या वाळू चोरीकडे मागील दोन-तीन महिन्यांपासून दुर्लक्ष केल्याचे खुद्द या गावातील नागरिक सांगतात. महसूल विभागालाही या वाळू चोरीची खबर नाही. त्यामुळे ही वाळू तस्करी कोण रोखणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दि. १५ रोजी सकाळी ८ च्या सुमारास बाबई शिवारातील वाळू पट्टयातून आरोपी चालक रमेश लिंबाजी जाधव व भीमा श्रीमंत जाधव, मालक आवेज करीम कुरेशी (सर्व रा. रांजणी ता. घनसांवंगी) हे संगनमत करून दुधना नदी पात्रातून विना परवाना बेकायदेशीररित्या शासनाच्या मालकीची दोन ट्रॅक्टरने वाळू भरून नेत होते. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी हे ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाच्या अधिकारी व पोलिसांना हा प्रकार कळवला. यावर पोलिस कर्मचारी जनार्दन सुक्रे, जगन्नाथ पालवे, सोळंके, नारायण आढे तसेच तलाठी अरूण कुलकर्णी हे घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून ट्रॅक्टर ताब्यात घेतले. गावकऱ्यांनीच पुढाकार घेवून राजरोसपणे चालणारे हे ट्रॅक्टर पकडून दिल्याने या प्रकाराची परिसरात चर्चा आहे. तलाठी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक बोलकर हे करीत आहेत. (वार्ताहर)
दुधना नदी पात्रातून वाळू चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर गावकऱ्यांनीच पकडले
By admin | Updated: March 16, 2015 00:46 IST