उस्मानाबाद : गतवर्षी जिल्हाभरात सरासरीच्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे यंदा टंचाईची तीव्रता फारशी नसली तरी मागील काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढत असल्याने जलस्त्रोत झपाट्याने आटू लागले आहेत. परिणामी, टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे प्रस्ताव प्रशासन दरबारी धडकू लागले आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात दोन टँकर आणि २४ अधिग्रहणांच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांची तहान भागविली जात आहे. सलग तीन ते चार वर्षे भीषण दुष्काळाला तोंड दिल्यानंतर गतवर्षी जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले. परिणामी अर्धाअधिक उन्हाळा सरत आला असतानाही पाणीटंचाईच्या झळा फारशा जाणवत नाहीत. दरम्यान, मागील १० ते १५ दिवसांपासून उन्हाची दाहकता सातत्याने वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून विहीर, बोअर, लहान-मोठ्या प्रकल्पांची पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळेच अशा जलस्त्रोतांवर अवलंबून असणाऱ्या गावांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील पहिला टँकर उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी येथे सुरू झाला. त्यानंतर आता भूम तालुक्यातील आष्टावाडी येथूनही टँकरची मागणी प्रशासनाकडे आली होती. त्यानुसार टँकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात टंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत १६ टँकर सुसज्ज अवस्थेत ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दोन टँकर, २४ अधिग्रहणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 21:32 IST