जालना : जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या दोन्ही पदांवर शासनाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून गिरी हे गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वीच रूजू झाले आहेत. तर जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बीड येथून बदलून आलेले डॉ. ए.डी. कोल्हे हे सोमवारी रूजू झाले.ही दोन्ही पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत होता. परिणामी कामांना विलंब होण्याचे प्रकारही होत होते. गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणूक आचारसंहिता लागण्याची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र अद्यापपर्यंत आचारसंहिता सुरू झाली नाही. तत्पूर्वी प्रशासनाकडून रिक्त जागांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांची औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी दीक्षितकुमार अशोक गेडाम हे बदलून आले आहेत. सा.बां. विभाग क्रमांक १ येथे कार्यकारी अभियंता राजपूत यांच्या बदलीनंतर बदलून आलेले तुपेकर हेही गेल्या आठवड्यातच रुजू झालेले आहेत. रोहयोचे उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे हे ३१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले.मात्र या जागेवर अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप जाधव हे ३१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा प्रभारी पद्भार डॉ. एम.के. राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात रिक्त असलेल्या काही पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने प्रशासनातील कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. ज्या एक-दोन जागा रिक्त आहेत, तेथेही नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाकडून लवकर केली जाईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
बहुप्रतीक्षेनंतर मिळाले दोन वरिष्ठ अधिकारी
By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST