लातूर : लातूर समाजकल्याण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव वैद्य यांना लाच प्रकरणात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडल्यानंतर लातुरातील त्यांचे घर सील करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पुणे पथकाने माधव वैद्य यांच्या समक्ष घराचे सील काढून झडती घेतली. या झाडाझडतीत रोख २ लाख रुपयांची रक्कम हाती लागली असून, शासकीय कामाच्या विविध २५ फायलीही सापडल्या आहेत. पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता लातुरात पोहोचले. सात जणांचा समावेश असलेल्या या पथकाने माधव वैद्य यांच्या उपस्थितीत व दोन शासकीय पंचांसमक्ष साईधाम येथील घराचे सील तोडले. यावेळी घरात दोन लाख रुपयाची रक्कम तसेच लातूर समाजकल्याण उपायुक्त कार्यालयात आलेल्या विविध कामांच्या २५ फायलीही सापडल्या. नांदेड येथील सेवालाल संस्थेतील ज्या कर्मचाऱ्याने वैद्य यांच्या विरोधात जी तक्रार केली होती, त्या संदर्भातील फाईलही लातूरच्या घरात सापडली आहे. ही फाईल एसीबीने जप्त केली असून, अन्य २५ फायली विद्यमान उपायुक्तांकडे हँडवर्क केल्या आहेत.
दोन लाखांची रोकड अन् २५ फायली जप्त !
By admin | Updated: July 24, 2015 00:45 IST