परंडा : मागील काही दशकांमध्ये डोकावून पाहिले असता परंडा तालुक्यामध्ये सहाकाराचे जाळे मोठ्या झपाट्याने विस्तारत गेले. परंतु, हे जाळे सध्या कमकुवत होताना दिसून येत आहे. तब्बल ३८ सहकारी संस्थांना अवसायनामध्ये काढण्याची नोटीस परंडा सहाय्यक निंबधक कार्यालयाने काढलेली होती. यामध्ये संस्था चालकांची धावपळ उडाली होती. परंतु, तीस दिवसांच्या मुदतीत संबंधित संस्थानी लेखापरिक्षण न केल्याने १५ सहकारी संस्था अंतिम अवसायनात निघाल्या आहेत. तर उर्वरित २३ सहकारी संस्थांचा प्रवासही त्याच मार्गाने सुरू आहे. खासापुरी धरणासह चांदणी, खंडेश्वरवाडी आदी प्रकल्पांच्या माध्यमातून परंडा तालुक्याच्या सिंचन क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळेच गावोगावी पाणी वापर संस्था उदयास आल्या. त्यांचा कारभारही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आजघडीला केवळ एकच संस्था अवसायनात निघाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार परंडा तालुक्यातील १५ ते १६ सहकारी संस्थांवर सहाय्यक निबंधकांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १९६० चे कलम १०२ अन्वये संबंधित संस्था अवसायनात काढण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नागेश्वरी ग्रामीण बि.शे.सह पतसंस्था सोनारी, प्रियदर्शनी नागरी सह. पतसंस्था परंडा, यशवंत बि. शे. सह पतसंस्था डोंजा, सहारा बि. शे. सह. पतसेस्था लोणी, कालिकादेवी बि.शे.सह मतसंस्था आनाळा, कुक्कडेश्वर बि.शे.सह.पतसंस्था कुक्कडगांव, वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्था म. परंडा, वसंतराव पाटील ग्रा. पतसंस्था म. इनगोंदा, क्षमहरणी ग्रा. पतसंस्था डोमगाव, भूम-परंडा तालुका शेतकरी सह. सूत गिरणी परंडा, परंडा तालुका देखरेख सहकारी संस्था परंडा, शिवशक्ती ग्रा.बि.शे.पतसंस्था शेळगाव, राष्ट्रमाता राजमाता ग्रा.बि.शे.पतसंस्था सोनारी आणि परंडा येथील राष्ट्रमाता जिजाऊ नागरी.सह. पतसंस्थेचा समावेश आहे.(वार्ताहर)अवसायनाची कारवाई सुरु झाल्यामुळे संस्थाचे सचिव, दप्तर व अन्य माहितीची शोधाशोध सुरु झाली आहे. अनेकांना संस्थेबाबत इतंभूत माहिती नाही. त्यामुळे संबंधित अध्यक्ष-सचिवांच्या अडचणीमध्ये अधिक भर पडली आहे. अशा संस्थाना ३० दिवसांच्या आत आॅडिट करून सहाय्यक निबंधकांना तो अहवाल साद करून बाजू मांडण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु, अनेक संस्था पदाधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने आजवर १५ संस्था अवसायनात काढण्यात आल्या असून उर्वरित २३ संस्थांचा प्रवासही त्याच दिशेने सुरू आहे.परंडा तालुक्यातील २३३ सहकारी संस्थापैकी ११० सहकारी संस्थांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्या ३१ डिसेबर अखेर निवडणुका घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. येत्या काळात आणखी काही संस्थांचा कार्यकाळ संपेल. अशा संस्थाही निवडणुकीसाठी पात्र असतील. परंतु, संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक असणारे सहकारी निवडणूक प्रधिकरणच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र दिड महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने प्राधिकरणाची स्थापना केली असून विधानसभेच्या निवडणुकीनंतर सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचे काम कार्यालयीन स्तरावर युद्धपातळीवर सुरु आहे. अवसायनात निघालेल्या सर्व संस्थापैकी सरस्वती विद्यार्थी ग्राहक भांडार परंडा या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे परंडा सहाय्यक निबंधक हरि कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.
तेवीस सहकारी संस्था ‘अवसायना’च्या मार्गावर !
By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST