तुळजापूर : आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षेचा केंद्रीय गुप्तचर विभाग, राज्य गुप्तचर शाखा, जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री आढावा घेतला़ त्यावेळी मंदिरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी योग्य पध्दतीने होत नसल्याचे समोर आले असून, नापास सुरक्षा रक्षकांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे़ लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवर ऐरणीवर आला आहे़ प्रत्येकवेळच्या तपासणीनंतर काही दिवसच कडेकोट तपासणी करण्यात येते, त्यानंतर सुरक्षा रक्षकांचे तपासणीकडे दुर्लक्ष कायम असते़ आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री केंद्रीय गुप्तचर विभागाचे अधिकारी ठाकरे, राज्य गुप्तचर शाखेचे अधिकारी अभंगराव, जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी दंभाळे, पोनि ज्ञानोबा मुंडे, मंदिर चौकीचे पोनि भूमे यांच्या पथकाने मंदिर सुरक्षेची एका प्रात्यक्षिकाद्वारे पाहणी केली़ प्रात्यक्षिकादरम्यान ठिकठिकाणी भाविकांसह मंदिरात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करण्यात येत नसल्याचे समोर आले़ या गंभीर प्रकाराचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे़ मंदिरातील सुरक्षा रक्षकांकडून योग्य रित्या तपासणी होत नसल्याचे वारंवार समोर आले आहे़ कारवाई नंतर किंवा वरिष्ठांच्या हजेरीनंतरच काही काळ सर्वांची तपासणी करण्यात येते़ त्यांनतर मात्र, परिस्थितीत पूर्ववत असते़ शुक्रवारच्या तपासणीनंतर तरी कायमस्वरूपी कडेकोट तपासणी व्हावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे़ श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेची पथकाने पाहणी केल्यानंतर सुरक्षा रक्षकांचे धाबे दणाणले आहेत़ त्यामुळे शनिवारपासून भाविकांसह पुजाऱ्यांचीही कडेकोट तपासणी करण्यात येत आहे़ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन महिला पोलिस, दोन पोलिस व तीन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत़ त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे़ आवश्यकतेनुसार कर्मचारी वाढवू ४याबाबत तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे़ मंदिर चौकीत एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन फौजदारांसह ७१ पोलिस कर्मचारी व मंदिराचे १६० सुरक्षा रक्षक तैनात आहेत़ नवरात्रोत्सवासह इतर काळात गरज पडली तर आवश्यकतेनुसार कर्मचारी वाढविण्याची मागणी वरिष्ठांकडे करण्यात येणार असल्याचे पोनि मुंढे यांनी सांगितले़
तुळजापुरातील सुरक्षा यंत्रणा ‘फेल’
By admin | Updated: August 24, 2014 00:19 IST