तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीची बलिप्रतिपदा, दिवाळी पाडव्यानिमित्त शिवकालीन अलंकार घालून विशेष पूजा मांडण्यात आली होती़ देवीची ही विशेष पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती़श्री तुळजाभवानी मंदिरात गुरूवारी रात्री चरणतीर्थ झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी धुपारती केली़ त्यानंतर महंत चिलोजीबुवा, महंत तुकोजी बुवा, महंत प्रकाशनाथ या मठात व कालभैरव, टोल भैरव, मातंगी देवी या ठिकाणी जाऊन संस्थानच्यावतीने मानाची आरती करण्यात आली़ सकाळी तुळजाभवानी देवीची नित्योपचार अभिषेक पूजा झाल्यानंतर आरती, अंगारा हे धार्मिक विधी पार पडले़ यानंतर पाडवा सणानिमित्त श्री तुळजाभवानी देवीची शिवकालीन अलंकार घालून विशेष अलंकार पूजा मांडण्यात आली़ यात राजमुद्रा, मोहराची माळ, सूर्यहार, पाच व सात पदरी कंठ, मोत्याची माळ, हिरकणी पदक, चिताक, माणिक, पाचु व हिऱ्याची माळ, पोर्तुगीजकालीन माळ आदी दागिने घालण्यात आले होते़ याकामी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, भोपी पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले़ देवीजींची विशेष अलंकार महापूजा दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत होती़ (वार्ताहर)
तुळजाभवानी देवीची शिवकालीन अलंकार पूजा
By admin | Updated: October 25, 2014 23:48 IST