आशपाक पठाण ,लातूरलातूर शहरातील खाडगाव रिंग रोड लगत असलेल्या राम रहिम नगरात गटारीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे़ दुर्गंधी, बेडकाचा आवाज, रात्रीच्या वेळी सापांचा वावर आहे, येईल तो दिवस सारखाच़ गेल्या दोन वर्षांपासून येथील नागरिक नरक यातना सहन करीत आहेत़ मनपाने मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक असल्याचा कांगावा सुरू केला आहे़रिंगरोड लगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्याचे बांधकाम केले़ रस्त्याला लागून नाल्या बांधण्यात आल्याने त्या नाल्या उंचावर आहेत़ रस्त्याच्या बाजूचा परिसर थोडासा खोलात आहे़ राम रहिम नगर भागातील सर्व गटारींचे पाणी रिंगरोडच्या नालीला थोपले आहे़ उन्हाळा असो की पावसाळा इथे दुर्गंधीयुक्त पाण्याचा तलाव भरलेलाच असतो़ त्यातच कचरा, पाण्यावर हिरवे शेवाळ आल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़ लहान मुले घराबाहेर खेळणेही धोक्याचे आहे़ निवडणुका कुठल्याही असल्या की पाणी काढून देण्याबाबत आश्वासन मिळते़ एकदा मतदान झाले पुन्हा इकडे कुणीच फिरकत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ रात्रभर बेडूक ओरडतात, झोपही लागत नाही, घराबाहेर निघाले की, सापांची भीती असे नागरिक सांगत होते़ पाणी काढून रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन देत मनपाने या रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही केल्याचे नागरिकांनी सांगितले़
जिवंतपणी भोगतो नरक यातना !
By admin | Updated: October 1, 2014 00:41 IST