बाळासाहेब जाधव, लातूरजिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघातून तब्बल ९० उमेदवारांनी आपले नशिब अजमावले़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान यंत्रात बंद झालेल्या मतदानात पावणेपाच हजार मतदारांनी पक्षानी दिलेल्या उमेदवाराला नाकारल्याचे रविवारी निकालातून समोर आले आहे़ लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातून ९० उमेदवार मतदानरुपी दान मागण्यासाठी प्रचारसभा, प्रभातफेऱ्या, गाठीभेटी देवून मतदारांनी आपल्यालाच मतदान द्यावे यासाठी परिश्रम घेतले होते़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झाली़ यामध्ये मतदारांनी केलेल्या मतदानातून उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करण्यात आले़ परंतु यामध्ये सहाही मतदार संघात नकाराधिकार वापरणाऱ्या मतदारांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले़ यामध्ये अहमदपूर विधानसभा मतदार संघातून एकूण मतदारांपैकी ६८१ मतदारांनी विविध पक्षाने दिलेले उमेदवार नाकारुन नोटा या बटनावर शिक्कामोर्तब केले़ निलंगा विधानसभा मतदार संघातून ७९१ मतदार, औसा विधानसभा मतदार संघातून ९१४ मतदार, उदगीर मतदार संघातून ९५५ मतदार, लातूर शहर विधानसभा मतदार संघातून ५३९ मतदार व लातूर ग्रामीण मतदार संघातून ८३२ जणांनी विविध पक्षाने दिलेल्या उमेदवारांना नाकारुन नोटा या बटनावर शिक्कामोर्तब करुन उमेदवाराविषयी नकाराधिकार दर्शविला आहे़
लातूर जिल्ह्यात पावणेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’
By admin | Updated: October 20, 2014 00:33 IST