अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे भीषण पाणीटंचाई स्थिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवत असून ४२ गावांमध्ये ५३ विंधन विहिरी व विहिरी पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर पाच वाडया व तांडयांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. परत आलेल्या ऊसतोड मजुरांना पाणी व चारा याचा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. अंबाजोागाई तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा तीव्र सामाना करावा लागत असून वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढू लागल्याने. अंबाजोगाई तालुक्याची स्थिती भयावह झाली आहे. गावोगावी महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ अनेक गावांमध्ये आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. ऊसतोडीचे काम करून परत आलेल्या मजुरांना आता आपला अर्धा दिवस पाण्यासाठीच घालवावा लागत आहे. अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा, पाटोदा, सातेफळ, माकेगाव, चनई, दगडवाडी, बर्दापूर तांडा, मुडेगाव, देवळा, धानोरा बुद्रुक, जवळगाव तांडा, घोलपवाडी, लिंबगाव तांडा, कोळकानडी, लमाणतांडा, हरणखोरी तांडा, बाभळगाव, कांदेवाडी, दस्तगीरवाडी, तळेगाव घाट, सौंदना, कुंबेफळ, सुगाव, दरडवाडी, राडीतांडा, दैठणा, घाटनांदूर, हिवराखुर्द, भतानवाडी, वाकडी, भावठाणा, वाघाळवाडी, वाघाळा, श्रीपतराय वाडी, नांदडी, राडी, दरडवस्ती, नांदगाव, जयहनुमान तांडा, कोपरा, धानोरा खुर्द, या ४२ गावांमध्ये ११ विहिरी व ४२ विंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील काळवटी तांडा, कुरणवाडी, टिका तांडा, आलुतांडा, गजानन वस्ती, या वाडयावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात परत आपआपल्या गावात आल्याने त्यांच्या गुरांचा, चार्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्रतेने भेडसावत आहे. ऊसतोड कामगारांच्या गुरांना चारा व त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष अविनाश लोमटे, राजा ठाकूर, विजय गंभीरे, यशपाल बावणे, शैलेश कुलकर्णी यांनी केली आहे. जलस्त्रोत आटू लागले उन्हाची तीव्रता व दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने अस्तित्वात असलेले जलस्त्रोतही आता आटू लागले आहेत. ज्या गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहण केल्या त्या इंधन विहिरीचेही पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. तसेच भारनियमनामुळेही पाण्याची उपलब्धता असूनही पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने जेव्हा वीज पुरवठा सुरू होतो. तेव्हाच पाणी सुटते. अशा स्थितीमुळेही पाणी असूनही पाण्याविना राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे. तिथे भारनियमनाचा कालावधी बदलावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रताप आपेट यांनी केली आहे. टंचाई निवारण कक्षच पाण्याअभावी अंबाजोगाईच्या पंचायत समितीत टंचाई निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला पाणीपुरवठा करण्याबाबत उपाययोजना केल्या जातात. मात्र, या कक्षातच पाण्याची सोय नसल्याने कक्षच पाण्याअभावी ठणठणाट सुरू आहे. भारनियमनाने वाढली समस्या टंचाई निवारणासाठी ११ विहिरी व ४२ खाजगी विंधन विहिरींचे अधिग्रहण पाच वाड्या, वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा आठ ते बारा तासांच्या भारनियमनामुळे उपलब्धता असूनही पाणी मिळेना ग्रामस्थांना करावी लागतेय पाण्यासाठी भटकंती
अंबाजोगाई तालुक्यात ४२ गावे तहानलेली
By admin | Updated: May 30, 2014 00:23 IST