लातूर : लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याअंतर्गत जुन्या बेवारस वाहनांचा आकडा हजारावर गेला आहे़ कार्यालयीन वाहने लावण्यासाठी जागा नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तरीही पोलीस अधिकारी या वाहनांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष करीत असल्याने या वाहनांचा आकडा हजारावर गेला आहे. गांधी चौक, शिवाजी चौक, ग्रामीण पोलीस, एमआयडीसी पोलीस या चारही पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी, कार, ट्रक, ट्रॅक्टर, आॅटो तसेच चोरीला गेलेल्या व अपघातामुळे सोडलेली वाहने जप्त आहेत.त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ती वाहने त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यात जमा केलेल्या आहेत़ या वाहनामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातील पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे़ पोलीस ठाण्यात मिळेल त्या ठिकाणी पार्किंग होत असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी या बेवारस वाहनांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत़ लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात तीन आॅटो, जीप, कार व दुचाकींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे़ तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही चार कार, एक ट्रॅक्टर व तीनशेच्या जवळपास दुचाकी आहेत़ तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कार, ट्रक व दुचाकी बेवारस वाहनांचा आकडा तीनशेच्या वरच आहे़ तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हीच परिस्थिती आहे़ त्यामुळे चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पार्किंगसाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ ही वाहने लिलाव काढून विक्री करावी लागतात. यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु गेल्या दहा वर्षांपासून लिलावच झाला नसल्याने बेवारस वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ (प्रतिनिधी)
एक हजार वाहने लिलावाअभावी धूळ खात
By admin | Updated: January 23, 2015 00:55 IST