औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट कधी येईल, हे निश्चित नाही. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. कंत्राटी पद्धतीवर ८ बालरोग तज्ज्ञांची भरती करण्यात येत आहे. कोरोना चाचणीसाठी तब्बल अडीच लाख ॲंटिजन आणि आरटीपीसीआरच्या किट मागविण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत मनपा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना प्रभावी ठरल्या. शहर ७ जूनला अनलॉक झाले. मनपाचे सर्व कोविड केअर सेंटर बंद झाले. डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका वर्तविण्यात आला आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. ८ बालरोग तज्ज्ञांची भरती करण्यात येत आहे. महापालिकेने या पदांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सध्या शहरात दररोज २ हजार कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. तिसरी लाट आल्यास वेळीच चाचण्या वाढवून संसर्गाला आळा घालता यावा यासाठी पुरेशा प्रमाणात कोरोना तपासणी किट उपलब्ध असणे गरजेचे आहे. म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने २ लाख ॲन्टिजन आणि ५० हजार आरटीपीसीआर किट खरेदी केल्या आहेत. तसेच कोरोनासाठी आवश्यक औषधीही मागविण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
सध्या मनपाने लसीकरणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील किमान ७० टक्के नागरिकांना लस कशा पद्धतीने देता येईल, यादृष्टीने नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लसींचा साठा मिळत नाही. त्यामुळे अधूनमधून लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे.