उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याबाबत समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ६६ महाविद्यालयांना नोटीस पाठविण्यात आली होती. याला आता आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी यातील केवळ वीस महाविद्यालयांनी हे अर्ज सादर केले असल्याने उर्वरित महाविद्यालयांकडून या नोटिसीलाही ठेंगा दाखविल्याचे दिसत आहे.अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार केंद्र शासनाने विहित केलेल्या दराने निर्वाह भत्ता तसेच कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयाने शिष्यवृत्ती, शिक्षण फीस, परिक्षा फीस वितरित करण्यासाठी ‘इ-शिष्यवृत्ती’ योजना कार्यान्वित केली. मात्र, विद्यार्थ्यांच्या हिताच्या या योजनेला महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे खिळ बसत आहे. जिल्ह्यातील तब्बल ६६ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्जच पाठविले नसल्याने या महाविद्यालयातील ६८७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. यावर समाजकल्याण विभागाने या महाविद्यालयांना नोटिसा बजावून अर्ज सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर महाविद्यालयांकडून समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, यालाही आता दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, या कालावधीत ६६ पैकी केवळ वीस महाविद्यालयांनी ही कार्यवाही पूर्ण केली. दरम्यान, उर्वरित महाविद्यालयांकडूनही ही कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांकडून नोटिसीलाही ठेंगा
By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST