हरी मोकाशे , लातूरभाजपाला मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ जागा हव्या आहेत अशी आमची आग्रही मागणी असल्याचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी लातूर येथे लोकमत कार्यालयाच्या भेटीदरम्यान सांगितले़ विधानसभा निवडणुकीसाठी युती होईल़ परंतु, गेल्या अनेक निवडणुकांत शिवसेनेच्या ५९ उमेदवारांचा पराभव झाला असताना त्या जागांच्या मुद्यावर शिवसेना गप्प आहे, असेही ते म्हणाले़केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले, भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी वज्रमुठ- एकजूट अशी रचना केली आहे़ त्यानिमित्ताने तालुका, जिल्हास्तरावर बैठकाही घेण्यात येत आहेत़ राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती व्हावी अशी नेते आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे़ मंगळवारपर्यंत हे निश्चित होऊन युती होईल़ युती झाल्यास मराठवाड्यात भाजपा २१ जागांवर लढणार आहे़ युती न झाल्यास सर्वच ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत़ यापूर्वी भाजपाला शिवसेनेने मराठवाड्यातील १९ जागा दिल्या़ परंतु, त्यात वाढ होण्यासाठी आमचा आग्रह आहे़ राज्यात मोदी लाट कायम असून राज्यात २४५ विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे़ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपाकडून ५ जागा आपल्याकडे घेतल्याच आहेत़ परंतु, आता विधानसभा निवडणुकीवेळी पराभूत झालेल्या ५९ जागांवर चर्चा करण्यासंदर्भात शिवसेना गप्प आहे़ हरलेल्या जागांसंदर्भात पुन्हा चर्चा न करणे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी उपलब्ध करून देणेच ठरत असल्याचेही ते म्हणाले़ काम न करता मते मागण्याची निती काँग्रेसची असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, नव्या रचनेनुसार मराठवाड्यातील २१ जागा भाजपाकडे घेण्यात येणार आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे मराठवाड्यात भाजपा वाढविण्याची धुरा माझ्या खांद्यावर आहे़ त्यादृष्टीने माझा सोमवारचा लातूर दौरा होत आहे, असेही ते म्हणाले़ यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे आदी उपस्थित होते़
मराठवाड्यात २१ जागा हव्यात
By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST